Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
Marathwada Marathwada
Marathwada Marathwada
  • Home
  • Jalna
  • Sambhajinagar
  • pune
  • parbhani
  • Home
  • Jalna
  • Sambhajinagar
  • pune
  • parbhani
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Pune

भदंत महास्थविर चंद्रमणी : विस्मृतीत गेलेल्या एका दीपस्तंभाची स्मृती

By badaltamarathwada
June 6, 2026 5 Min Read
0

प्रवीण बागडे, 

नागपूर 

मो.क्र. ९९२३६२०९१९

————————————————-

          ६ जून हा दिवस भारतीय बौद्ध इतिहासात केवळ एका भिक्खूचा जन्मदिन नाही तर तो भारतीय सामाजिक पुनर्जागरणाच्या एका शांत, संयमी पण दूरगामी क्रांतीचा स्मृतिदिन आहे. ६ जून १८७३ रोजी ब्रह्मदेशातील आराकान प्रांतात जन्मलेले भदंत महास्थविर चंद्रमणी हे नाव उच्चारले की नागपूरच्या धम्मदीक्षेचे, कुशीनगरच्या पुनरुज्जीवनाचे आणि भारतातील बौद्ध धर्माच्या नव्या पर्वाचे एक विलक्षण पान डोळ्यांसमोर उभे राहते. ८ मे १९७२ रोजी त्यांनी देह ठेवला पण त्यांनी प्रज्वलित केलेली धम्मज्योत आजही अनेकांच्या विचारांना दिशा देत आहे. इतिहासाची एक मोठी विडंबना अशी असते की, जे लोक शांतपणे युगनिर्मिती करतात, त्यांची नावे अनेकदा जनस्मृतीच्या काठावरच राहतात. भदंत चंद्रमणी यांच्याबाबतही असेच झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्मदीक्षेचा प्रसंग आपण अत्यंत अभिमानाने सांगतो पण त्या ऐतिहासिक क्षणी दीक्षादान करणारे महास्थविर चंद्रमणी कोण होते, त्यांच्या आयुष्याचा संघर्ष काय होता, भारतासाठी त्यांनी कोणती तपश्चर्या केली, हे अनेकांना ठाऊक नसते. म्हणूनच त्यांची स्मृती ही केवळ श्रद्धेची बाब नाही तर ती इतिहासाशी प्रामाणिक राहण्याची जबाबदारी आहे.
       ब्रह्मदेश हा बौद्ध संस्कृतीने नटलेला प्रदेश. तेथील जनमानस भारताकडे पवित्र भूमी म्हणून पाहत आले. कारण हीच ती भूमी जिथे भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली, धम्मचक्र प्रवर्तन केले आणि करुणा, प्रज्ञा व समतेचा संदेश जगभर पोहोचविला. अशा भूमीत जन्मलेल्या चंद्रमणींच्या मनात भारताबद्दल ओढ असणे स्वाभाविकच होते. अवघ्या सोळाव्या वर्षी १८८९ मध्ये ते भारतातील बौद्ध तीर्थक्षेत्रांच्या दर्शनासाठी आले. हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील केवळ धार्मिक यात्रा नव्हती तर ती त्यांच्या आयुष्याचा निर्णायक वळण ठरली. भारतभूमीत पाऊल ठेवताना त्यांच्या मनात एक भव्य कल्पना असणार बुद्धाची भूमी, धम्माची भूमी, समतेच्या विचारांची भूमी. परंतु जे दृश्य त्यांनी पाहिले ते त्यांच्या अंत:करणाला खोलवर भिडले. ज्या देशाने जगाला बौद्ध धर्म दिला, त्या देशातच बौद्ध धर्माचे अनुयायी नगण्य! बुद्धाची स्मारके भग्नावस्थेत, तीर्थक्षेत्रे उपेक्षित, आणि बुद्धाचा समतामूलक संदेश समाजाच्या काठावर फेकलेला. हा धक्का त्यांच्या आयुष्याला नवीन अर्थ देऊन गेला. त्यांनी परत ब्रह्मदेशी न जाण्याचा निर्णय घेतला. १८८९ पासून त्यांनी भारतालाच आपली कर्मभूमी मानले.
         ही निवड साधी नव्हती. एका तरुणाने आपल्या जन्मभूमीचा, कुटुंबाचा, परिचित संस्कृतीचा त्याग करून एका अशा देशात राहण्याचा निर्णय घेतला, जिथे त्याला ना सत्तेचा आधार होता, ना संपत्तीचा. त्याच्याकडे होते ते केवळ धम्मावरील निष्ठा आणि भारताबद्दलची करुणा. आजच्या काळात हा निर्णय समजून घेणेही कठीण आहे. कारण आज अनेकदा धर्म हा केवळ विधी, प्रतीक आणि ओळखीचा विषय बनतो, पण चंद्रमणींसाठी धर्म म्हणजे लोककल्याणाची अखंड साधना होती. भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण ज्या पवित्र भूमीत झाले, त्या कुशीनगरला त्यांनी आपल्या कार्याचे केंद्र बनविले. त्या काळात कुशीनगर हे जागतिक बौद्ध नकाशावरचे तेजस्वी केंद्र नव्हते. ते उपेक्षित, दुर्लक्षित आणि इतिहासाच्या धुळीत हरवलेले होते. भदंत चंद्रमणींनी तेथे केवळ वास्तव्य केले नाही, तर त्या भूमीला नवजीवन दिले. बुद्धजयंती उत्सव, बौद्ध संमेलने, धम्मपरिषदांची परंपरा त्यांनी रुजविली. त्यातून कुशीनगर पुन्हा एकदा जागतिक बौद्ध चेतनेचे केंद्र बनू लागले.
        एका व्यक्तीची दृष्टी किती दूरवर परिणाम करू शकते, याचे हे जिवंत उदाहरण आहे. कारण त्यांनी फक्त धार्मिक कार्यक्रम घडविले नाहीत, तर त्यांनी धम्माला सामाजिक शक्ती बनविण्याचा प्रयत्न केला. धर्म जिवंत राहतो तो केवळ मंदिरांमुळे नाही, तर विचारांच्या परंपरेमुळे. म्हणूनच त्यांनी शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवले. शेकडो तरुण-तरुणींना त्यांनी बौद्ध वाङ्मयाचा अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले. काहींना सिलोन, जपान, ब्रह्मदेश अशा बौद्ध देशांत उच्च शिक्षणासाठी पाठविले. त्या काळात हे कार्य किती मोठे आणि दूरदृष्टीचे होते, याची कल्पना आज सहज होत नाही. कारण तेव्हा परदेशात शिक्षण पाठविणे ही केवळ आर्थिकच नव्हे तर संघटनात्मकदृष्ट्याही कठीण बाब होती. पण चंद्रमणींना माहीत होते की विचारांची परंपरा टिकवायची असेल, तर विद्वानांची पिढी तयार करावी लागते. याच प्रयत्नांतून दोन तेजस्वी नावे पुढे आली, आनंद कौसल्यायन आणि राहुल सांकृत्यायन. या दोघांनी भारतीय बौद्ध बौद्धिक परंपरेला नवे क्षितिज दिले. विशेषतः राहुल सांकृत्यायन यांनी तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माची हजारो हस्तलिखिते शोधून भारतात आणली. ज्ञानाची ती संपदा भारताच्या सांस्कृतिक पुनरुज्जीवनासाठी अनमोल ठरली. या महान कार्यामागे चंद्रमणींची प्रेरणा होती, हे विसरता येणार नाही.
       आज आपण ज्ञान, संशोधन, संस्कृती आणि वारसा याबद्दल मोठ्या चर्चा करतो; पण भदंत चंद्रमणींनी शंभर वर्षांपूर्वी हे सारे प्रत्यक्ष कृतीत उतरविले होते. त्यांची दृष्टी केवळ अध्यात्मिक नव्हती; ती बौद्धिक, सांस्कृतिक आणि सामाजिक होती. कुशीनगरमध्ये त्यांनी धर्मशाळा उभारल्या, दवाखाने सुरू केले, स्तूप बांधले, गरीब मुलांसाठी शाळा काढल्या. ही कामे सांगताना त्यांची खरी ओळख उलगडते. कारण ते फक्त धर्मोपदेशक नव्हते तर ते समाजकारणाच्या मूळ प्रश्नांना भिडणारे धम्मसेवक होते. भूक, अशिक्षा, आजार, दारिद्र्य या साऱ्या मानवी वेदनांपासून धर्म वेगळा असू शकत नाही, हीच बुद्धाची शिकवण त्यांनी प्रत्यक्ष जगली. त्यांनी उभारलेल्या इमारतींची किंमत चाळीस वर्षांपूर्वी सात लाख रुपये होती, असे म्हटले जाते. परंतु त्या वास्तूंची खरी किंमत रुपयांत मोजता येणार नाही. कारण त्या केवळ विटा आणि दगड नव्हत्या, त्या भारतीय बौद्ध पुनर्जागरणाच्या पायाभरणीच्या साक्षी होत्या.
       चंद्रमणी हे विद्वान लेखकही होते. ब्रह्मी आणि हिंदी भाषेत त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. धम्मपद, मंगलसूक्त, भगवान बुद्धाचे चरित्र, बुद्धाचे उपदेश यांसारख्या ग्रंथांमधून त्यांनी बौद्ध धर्माची गूढता नव्हे, तर त्याची जीवनस्पर्शी बाजू सामान्य माणसापर्यंत पोहोचविली. ज्ञान लोकांपर्यंत नेण्याची ही लोकाभिमुख वृत्तीच त्यांना विलक्षण मोठे बनवते आणि मग येतो भारतीय इतिहासातील तो थरारक क्षण १४ ऑक्टोबर १९५६, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मातील जातिभेद, अपमान आणि अमानुषतेविरुद्ध अंतिम बंड पुकारत बौद्ध धर्म स्वीकारला. हा प्रसंग केवळ धार्मिक परिवर्तन नव्हता तर तो भारतीय सामाजिक क्रांतीचा महामोर्चा होता. या महान ऐतिहासिक क्षणी बाबासाहेबांनी दीक्षा देण्यासाठी ज्यांची निवड केली, ते होते महास्थविर चंद्रमणी. ही निवड योगायोग नव्हती. बाबासाहेबांना अशा व्यक्तीची गरज होती ज्याच्या हातात परंपरेची शुचिता, विद्वत्तेची खोली आणि करुणेची उब असेल. चंद्रमणी त्या सर्व गुणांचे मूर्तिमंत प्रतीक होते.
      अंशी वर्षांचा हा वृद्ध भिक्खू नागपूरला आला आणि लाखो लोकांच्या उपस्थितीत त्याने बाबासाहेबांना व त्यांच्या अनुयायांना त्रिशरण-पंचशील दिले. त्या क्षणी केवळ धर्मदीक्षा झाली नाही, भारतीय इतिहासाने नवीन दिशा घेतली. शतकानुशतके तुडविलेल्या, अपमानित केलेल्या जनसमुदायाला नव्या मानवी अस्मितेचा, समतेचा आणि स्वाभिमानाचा मार्ग मिळाला. आज धम्मदीक्षेच्या इतिहासात बाबासाहेबांचे नाव तेजस्वीपणे उजळते, तसेच उजळले पाहिजे. पण त्या तेजस्वी क्षणामागे उभा असलेला शांत दीपस्तंभ म्हणजे भदंत चंद्रमणी, ही जाणीव तितकीच आवश्यक आहे. आजच्या भारतात त्यांच्या स्मृतीचे महत्त्व आणखी वाढते. कारण आपण पुन्हा एकदा विषमता, द्वेष, सामाजिक ताण आणि ऐतिहासिक विस्मरणाच्या काळातून जात आहोत. अशावेळी चंद्रमणींचे जीवन आपल्याला सांगते की समाजबदलाचा पाया घोषणांत नसतो; तो निष्ठेत, ज्ञानात, शिक्षणात आणि माणसांवरील करुणेत असतो. त्यांनी सत्ता मागितली नाही, प्रसिद्धी शोधली नाही, स्वतःसाठी कोणताही पंथ उभारला नाही. त्यांनी फक्त एक काम केले, बुद्धाचा विचार भारतात पुन्हा रुजविण्याची आयुष्यभर तपश्चर्या. आजचा समाज जर खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतीला अभिवादन करू इच्छित असेल, तर ते केवळ माल्यार्पणाने होणार नाही. ते होईल समतेचा विचार जगवून, शिक्षणाला सामाजिक मुक्तीचे साधन मानून आणि इतिहासातील अशा मूक महापुरुषांना योग्य स्थान देऊन.
      ६ जूनला आपण त्यांचा जन्मदिन स्मरतो. पण ही स्मृती केवळ कॅलेंडरपुरती राहू नये. ती मनात प्रश्न निर्माण करणारी असावी. आपण बुद्धाच्या भूमीत बुद्धाचा संदेश कितपत जगतो आहोत? आपण समतेच्या मूल्यांशी किती प्रामाणिक आहोत? आणि आपण आपल्या इतिहासातील अशा दीपस्तंभांना किती जपतो आहोत? भदंत महास्थविर चंद्रमणी यांचे आयुष्य म्हणजे एका माणसाने शांतपणे केलेल्या महान कार्याची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांनी भारताला काही मागितले नाही, उलट भारताला त्याचा विसरलेला आत्मा परत मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वाहिले. इतिहासातील काही व्यक्ती अशा असतात की त्यांची उंची घोषणांनी नव्हे, तर काळाने सिद्ध केलेली असते. चंद्रमणी हे त्यापैकीच एक. म्हणूनच आज त्यांच्या स्मृतिदिनी एवढेच म्हणावेसे वाटते, धम्मदीक्षेच्या त्या ऐतिहासिक क्षणामागे उभा असलेला हा ऋषितुल्य भिक्खू भारतीय समाजाच्या कृतज्ञ स्मरणात अधिक उजळला पाहिजे. कारण काही नावे केवळ इतिहासाची नोंद नसतात तर ती राष्ट्राच्या नैतिक स्मृतीची ओळख असतात. भदंत महास्थविर चंद्रमणी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या करुणा, प्रज्ञा, समता आणि मानवमुक्तीच्या धम्मविचारांना विनम्र अभिवादन. त्यांनी प्रज्वलित केलेली धम्मज्योत आपल्या समाजाला अधिक न्याय्य, समतामूलक आणि विवेकनिष्ठ भविष्याकडे नेणारी प्रेरणा ठरो, हीच कृतज्ञ शुभेच्छा.

Author

badaltamarathwada

Follow Me
Other Articles
Previous

शिवराज्याभिषेक दिन स्वाभिमानाचा,शैर्याचा आणि सुसंस्कृतीचे जतन करणारा – दुर्गेश कठोठीवाले

Next

प्रतीक्षा संपली : जाफराबाद आगारात चार नव्या ई-बसेस दाखल

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • YouTube
Copyright 2026 — Marathwada. All rights reserved. Blogsy WordPress Theme